पुणे : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता शरद पवार गटाच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी खासदार संजय राऊतांना जोरदार टोला लगावला आहे.
दरम्यान, निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत.
दरम्यान, खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक देखील केले. यावरून मात्र ठाकरे गटांकडून थेट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी पवारसाहेब आम्हाला देखील राजकारण कळतं अशी टीका केली होती. यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधून खासदार संजय राऊतांना टोला लगावला आहे. खासदार राऊत यांनी अशा पद्धतीने टीका करणे हे दुर्दैव आहे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
कोल्हे म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होत असताना केवळ एकनाथ शिंदे साहेबच नाही तर अनेकांचा सत्कार या कार्यक्रमात होता. कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक गोष्टी पहायला पाहिजेत असे मला वाटते. राऊतसाहेबांना इतके दु:ख झाले असेल, तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख केला, उद्धव ठाकरे सुद्धा अजित पवारांना भेटले, आपण याला स्टेटसमनशिप म्हणून बघूया. प्रत्येकवेळी राजकारण आणलं तर अवघड होईल, असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
हे उगाचच तु-याला आरसा दाखवण्यासारखे आहे. पवारसाहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की, राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे’’ असे स्पष्ट मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
पुरस्कार देण्याघेण्याचे गणित अत्यंत सोपे
सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे पवारांवर निशाणा साधला आहे. टिळक पुरस्कारासाठी मोदी पुण्यात आले होते. मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदी यांना विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय रस्त्यावर उतरले होते. मोदी गो बॅकच्या घोषणा देत, या विरोध प्रदर्शनामध्ये एनसीपी एसपीसुद्धा सहभागी होती. पण त्याच पुरस्कार सोहळ्याला शरद पवार यांची उपस्थिती होती. मुळात पुरस्कार देण्याघेण्याचे गणित अत्यंत सोपे आहे. जे व्यवस्थेची भलावण करतात त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते आणि जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना व्यवस्था बहिष्कृत ठरवते, असा टोला त्यांनी लगावला आहे.
भाजपचे कलुषित राजकारण : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, ‘‘दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊतांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण, मागील दोन-तीन वर्षात भाजपने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी!