एकमतचा वर्धापनदिन उत्साहात
शुभेच्छांचा वर्षाव, ९० सन्मानार्थींचा कृतज्ञता सन्मान
लातूर : प्रतिनिधी
समाजात विविध प्रकारचे मतप्रवाह आहेत. मात्र, विचारांचे एकमत झाल्याशिवाय ख-या अर्थाने समाजविकास, विधायक कार्य होत नाही, याची जाण विकासरत्न विलासराव देशमुख यांना होती. हे एकमत घडविण्यासाठीच ख-या अर्थाने एकमत जन्माला आले, त्याचा मी साक्षीदार आहे, अशी एकमतची जन्मकथा सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी गेल्या ३३ वर्षांपासून मी एकमतचा प्रवास बघत आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांचे विचार आणि उद्दिष्टांशी बांधील राहूनच एकमतची वाटचाल सुरू आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे, अशा शब्दांत एकमतचा गौरव केला.
एकमतच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार, दि. २० ऑगस्ट रोजी येथील मार्केट यार्ड भागातील दगडोजीराव देशमुख सभागृहात स्नेहमेळावा पार पडला. या मेळाव्यात विविध क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या जिल्ह्यातील ९० सन्मानमूर्तींचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे हे होते. यावेळी व्यासपीठावर एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर, प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे उपसभापती सुनील पडिले, ट्वेंटी-वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, लातूर जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, डी. एन. केंद्रे, प्रभाकर सुडे, तालमणी डॉ. राम बोरगावकर, द्वारकादास श्यामकुमारचे तुकाराम पाटील उपस्थित होते.
सध्याच्या काळात कोण कोणाचे कौतुक करीत नाही. मात्र, एकमत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करते. हे विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या विचारांशी एकरूप होऊन काम करीत असल्याचे द्योतक आहे. हा स्तुत्य उपक्रम गेल्या ६ सहा वर्षांपासून राबविला जात आहे, याबद्दल मला खरोखरच मनापासून आनंद आहे, असेही नागराळकर म्हणाले.
विकासरत्न विलासराव देशमुख यांनी नेहमीच समाजहित, लोकहित डोळ््यासमोर अनेक धाडसी निर्णय घेतले. लोकोपयोगी उपक्रम राबविताना त्यांनी कधीच नफ्या-तोट्याचे गणित घातले नाही. सर्वांची साथ आणि खंबीर नेतृत्वामुळे गेल्या ३३ वर्षांपासून एकमत अविरतपणे सुरू आहे. एकमत हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. त्यामुळे माझं एकमत ही आपुलकी उराशी बाळगून सर्वांनी एकमतवर प्रेम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी एकमतचे संस्थापक विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकात एकमतचे संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांनी एकमत ३ दशकांचा प्रवास करून चौथ्या दशकातील ३ वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात दमदार वाटचाल करीत आहे, असे सांगत एकमतच्या प्रगतशील वाटचालीचा इतिहास मांडला. वृत्तपत्र हे जनतेच्या हृदयातील व्यासपीठ व्हावे, हा एकमतचे संस्थापक विकासरत्न विलासराव देशमुख यांचा विचार होता. त्याच विचारांशी बांधिल राहून एकमतची वाटचाल सुरू असून, एकमत आपल्या भागातील सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचे व्यासपीठ बनले आहे. एकमत व्यावसायिकदृष्ट्या कदाचित आघाडीवर नसेल, परंतु जनतेशी जोडलेली नाळ इतर वृत्तपत्रांपेक्षा मजबूत आहे. देशमुख कुटुंबीय भक्कमपणे पाठीशी उभे असल्याने यशस्वीपणे वाटचाल सुरू असल्याचे डोंग्रजकर म्हणाले. यावेळी तालमणी डॉ. राम बोरगावकर, द्वारकादास श्यामकुमारचे तुकाराम पाटील यांचीही भाषणे झाली. रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी त्यांनी वृत्तपत्र चालविणे आव्हान आहे. परंतु सर्वांच्या साथीने एकमतची दमदार वाटचाल सुरू आहे. एकमत हे सर्वसामान्यांचा आवाज आहे. त्यामुळे आपले एकमत म्हणून सर्वांनी प्रेम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एकमत झालाय
लोकल टू ग्लोबल
विकासरत्न विलासराव देशमुख यांनी एकमत रुजवले, वाढविले. त्याचा आता डौलदार वृक्ष झाला. गेल्या ३३ वर्षांत एकमतने अनेक उपक्रम राबविले. कोरोनाच्या काळात वृत्तपत्रासाठी नव्या वाटा शोधायची वेळ आली, तेव्हा एकमत डॉट कॉम नावाने पोर्टल उपलब्ध करून दिले. यामुळे एकमतचा मर्यादित असणारा वाचक ग्लोबल झाला. त्यामुळे एकमतने लोकल टू ग्लोबल अशी भरारी घेतली. आज एकमत तब्बल २७ देशांत नियमित वाचला जातोय. रोज १ लाख वाचक पोर्टलला भेट देतात. एकमतच्या या पोर्टलने अवघ्या ३ वर्षांत इतर व्यावसायिक वेबसाईटला मागे टाकले. हीच विश्वासार्हता कायम टिकवली जाईल, असा विश्वास एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांनी व्यक्त केला.
एकमतकडून सर्वांना
प्रोत्साहन देण्याचे काम
असे एकही क्षेत्र नाही, ज्यांचे एकमतने कौतुक केलेले नाही. एकमतचे उपक्रम खरोखरच स्तुत्य आहेत. विविध उपक्रमांतून एकमतने नेहमी सर्वांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. एकमतच्या स्थापनेपासून मी बघत आलेलो आहे. त्यांचे हे कार्य खरोखरच अभिनंदनास पात्र आहे. एकमतचे हे कार्य पाहता मीदेखील एकमतसाठी सांस्कृतिक सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असेन, असे मी जाहीर करतो, असे तालमणी डॉ. राम बोरगावकर म्हणाले.
माझ्या यशस्वी भरारीत
एकमतचा मोठा वाटा
एकमत म्हटले की, विकासरत्न विलासराव देशमुखसाहेबांचा चेहरा समोर येतो. माझ्या यशात एकमतचा फार मोठा वाटा असून, आमच्या व्यवसायाला घराघरांपर्यंत पोहोचविण्याचे काम एकमतने केले. खरे तर आमच्या प्रगतीचा आलेख साहेबांच्या आशीर्वादामुळे वाढत गेला. आज मराठवाड्यात द्वारकादास श्यामकुमारच्या २१ शाखा आहेत. या माध्यमातून अडीच हजार लोकांच्या हाताला काम मिळाले, असे द्वारकादास श्यामकुमारचे प्रमुख तुकाराम पाटील म्हणाले. एकमतचे उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून, वर्धापनदिनानिमित्त एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले.
उत्कृष्ट व्यवसायाबद्दल
एकमत प्रतिनिधींचा सत्कार
यावेळी उत्कृष्ट व्यवसाय करणारे एकमतचे नांदेड जिल्हा आवृत्ती प्रमुख चारुदत्त चौधरी यांच्यासह निलंगा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पाटील, शिरुर अनंतपाळचे तालुका प्रतिनिधी शकील देशमुख यांचा एकमतच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.