चंद्रपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील दिघोरी व गांगलवाडी परिसरातील ७३४ शेतक-यांनी भंडारा ते गडचिरोली या नव्यानेच तयार होणा-या समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास विरोध सुरू केला आहे. प्रशासनाने जमीन मोजणीसाठी नोटिसा बजावल्याने मंगळवारी (दि. २१) उपविभागीय अधिका-यांना निवेदन देऊन आधी आमचे म्हणणे जाणून घ्या. असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भंडारा ते गडचिरोली समृद्धी राज्य महामार्ग मंजूर करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो शेतक-यांच्या शेतजमिनी समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित करण्याची तयारी सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने याबाबत चर्चा न करता संबंधित शेतक-यांना ७/१२, सर्व्हे व गट क्रमांकाची प्रत देऊन मोजणीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. प्रशासनाने चर्चेविना नोटीस दिल्याने शेतक-यांनी समृद्धीसाठी शेतजमिनी देण्यास पुन्हा कसून विरोध सुरू केला आहे.
२७१.४१ हेक्टर जमीन अधिग्रहित करणार
दिघोरी व गांगलवाडी परिसरातून एकूण २७१.४१ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. त्यामध्ये काही टक्के वनजमिनीचाही समावेश आहे. २५७ हेक्टर सुपीक शेती बाधित हा परिसर भात उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भाताच्या शेतीसाठी ही जमीन सुपीक मानली जाते. ७३४ शेतक-यांकडून समृद्धी प्रकल्पासाठी २५७ हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे.