बुलडाणा : समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील डोणगावनजीक छत्तीसगडमधून पुण्याला जाणारी प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातामध्ये दोन प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. सुदैवाने बसमधील ५४ प्रवासी सुरक्षित आहेत.
छत्तीसगडमधून पुणे येथे खासगी प्रवासी बस जात होती. ५ जून रोजी पहाटे समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक १६७ जवळ असलेल्या पेट्रोलपंपानजीक चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. त्यात बस महामार्गाच्या कडेलाच उलटली. यामध्ये देविदास धुर्वे आणि राज बब्बर हे दोन प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेद्वारे त्वरित मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त कळताच डोणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल पवन गाभणे, आनंदा चोपडे, नितीन डुकरे आणि चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान बसमध्ये एकूण ५६ प्रवासी होते. त्यापैकी दोघेजण जखमी झाले होते. ५४ प्रवाशांना दुस-या वाहनाद्वारे पुढे पाठविण्यात आले आहे.