बुलडाणा : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचे पहावयास मिळत आहे. यात समृद्धी महामार्गावरील क्रमांक ३३६.८ मुंबई कॉरिडोरवर भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे.
समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची मालिका थांबलेली नाही. भरधाव वेगात वाहने चालविली जात असल्याने वाहन अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. असाच अपघात आज सकाळच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा होऊन रस्त्यावर कारचे पार्ट वेगवेगळे होऊन विखुरले गेले. सकाळी नागपूर येथील कारचालक श्रव मेलानी (वय २०) आपल्या मित्रासोबत नागपूरवरून संभाजीनगरकडे जाण्यासाठी निघाले होते.
सकाळची वेळ असल्याने कारचालकाला डुलकी लागली. यातच कार अनियंत्रित होऊन समोर जात असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. ट्रकचालक वैभव रावसाहेब व्यवहारे (वय २८, पुणे) हे हळुवारपणे इमर्जन्सी लेनवर आपले वाहन चालवत होता.