19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रसरकारची उच्च न्यायालयाकडून पोलखोल

सरकारची उच्च न्यायालयाकडून पोलखोल

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरील सुनावणीनंतर काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही, तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपाशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची (अपप्रचार) आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली असल्याची जहरी टीका काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली आहे. या सुनावणीनंतर विरोधी पक्ष महायुती सरकार, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, बदलापूरमधील चिमुरड्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीस आले असता न्यायमूर्तींनी या प्रकरणावर महत्त्वाचे निरिक्षण नोंदवले आहे. या प्रकरणाच्या चौकशी अहवालानुसार या मृत्यूला पाच पोलिस जबाबदार असल्याचे न्यायालयाने नोंदवले आहे.  अहवालानुसार पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय ठरू शकत नाही. त्यामुळे राज्याने या पोलिसांवर गुन्हा नोंदवून कारवाई करणे आवश्यक आहे, असंही न्यायालयाने म्हटले आहे.

वडेट्टीवार यांनी आपलं मत व्यक्त करत असताना वडेट्टीवारांनी शिंदे-फडणवीसांना धारेवर धरलं आहे. त्यांनी म्हटले की, बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलिस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे! त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वत:ला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे’’.

सरकारला चपराक नाही : रूपाली चाकणकर
कोर्टाचा निर्णय सरकारला चपराक म्हणता येणार नाही. बदलापूरमधील एन्काऊंटर प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन. पण, महाराष्ट्र असुरक्षित असल्याची विधाने विरोधक करतात, निवडणुकीतील पराभवामुळे ते आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच, फेक एन्काऊंटर घटनेसंदर्भात आयोगाकडे कुठलीही तक्रार नाही. पण, माहिती घेऊन व्यक्ती दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्की करू. अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

सरकार हस्तक्षेप करणार नाही : शिरसाट
बदलापूरच्या घटनेमध्ये जो अहवाल सादर केला, त्यावदर न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. जो कोणी दोषी असेल, जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घेईल. याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

माहिती घेऊन बोलतो : शंभुराज देसाई
शंभुराज देसाई यांनी प्रकरणी बोलण्याचे टाळले. न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात मला माहीत नाही, मी संबंधित अधिकारी यांच्यासोबत बोलून माहिती घेतो, त्यांनतर बोलतो अशी प्रतिक्रिया मंत्री देसाई यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR