बुलडाणा : प्रतिनिधी
राज्यातील विद्यार्थ्यांची देखील या सरकारला काळजी नाही. यंदाचा स्वातंत्र्यदिन हा शालेय विद्यार्थ्यांचा गणवेशाशिवाय होणार आहे. शाळा जून महिन्यात सुरू होऊन ऑगस्ट महिना उजाडला तरी अजून गणवेश मिळालेला नाही. टक्केवारीसाठी आणलेली महायुतीची गणवेश योजना देखील फसली आहे, अशी प्रतिक्रिया देत राज्य सरकारच्या कारभारावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुलडाणा येथे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाच्या विकासासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सरकारला आदर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम सुरू नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्ण झाले नाही. यावरून महायुती सरकारला बहुजनांच्या प्रतीकांबद्दल आस्था नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात भ्रष्टाचार शिगेला गेला आहे. बुलडाण्यामध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली पैसे घेऊन मोठे फार्म हाऊस बांधले जातात, त्यासाठी दुस-यांच्या जमिनी बळकावल्या जातात यासारखे दुर्दैव नाही.
निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. नंतर बहिणींची मते विकत घेतल्याच्या अविर्भावात महायुतीचे नेते वावरत आहेत. त्यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली जात आहे. हेच या सरकारचे खरे रूप आहे. सत्ताधारी आमदार बहिणींचा अपमान करत आहेत. सरकार माफी मागत नाही. त्यामुळे या सरकारला जनता धडा शिकवेल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.