मुख्यमंत्री आज करणार घोषणा
नागपूर : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ पातळीवर होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीआयडीचे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी ११ वाजता विधानसभेत सविस्तर निवेदन सादर करणार असल्याची माहिती आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी कोणते अधिकारी तपास करतील यावर गृहविभागाकडून निर्णय होणार आहे. तसेच या तपासाची कार्यकक्षा काय असणार हेदेखील गृह विभाग ठरवणार आहे. बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. पवनचक्की खंडणी वादाप्रकरणी ही हत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले हे अजितदादांच्या राष्ट्रवादीशी संबंधित होते. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली तर या खंडणीप्रकरणी ज्या वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत.
बीडमधील या हत्याकांडावर भाजपचे आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला. या प्रकरणाची संपूर्ण कहाणी सांगत त्यांनी यामध्ये कुणाकुणाचा हात आहे त्यांची नावेही घेतली. तसेच जोपर्यंत या प्रकरणी आरोपींचे कॉल रेकॉर्ड काढले जात नाहीत, तोपर्यंत त्यांना आदेश देणारा मास्टरमाईंड समोर येणार नाही, असे ते म्हणाले होते.