32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeसंपादकीय विशेष‘सर्वोत्तमा’च्या दबावाचे बळी

‘सर्वोत्तमा’च्या दबावाचे बळी

‘‘आई.. बाबा सॉरी. आय अ‍ॅम लूजर. मी जेईई करू शकली नाही. त्यामुळे आत्महत्या करत आहे. हाच शेवटचा पर्याय आहे.’’ अशा दु:खद ओळींसह कितीतरी वेदना सोबत घेऊन निहारिका नावाच्या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत जीवन संपविले. ती कोटा येथे कोचिंग सेंटरमध्ये जेईई परीक्षेची तयारी करत होती. ‘एनसीबीआरबी’च्या ताज्या अहवालानुसार, भारतात गेल्या एक दशकात आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात ७० टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी अमेरिकेत गेल्या दोन दशकांत तरुणांच्या आत्महत्येचा दर हा ६२ टक्क्यांनी वाढला आहे. लेखिका जेनिफर ब्रेहेनी वॉलेस यांच्या मते, सतत चांगली कामगिरी करण्याच्या दबावामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. चांगल्या कामगिरीचा दबाव हा केवळ पालकांकडूनच नाही, परंतु प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हा समाजातून निर्माण झाला आहे.

‘आई..बाबा सॉरी. आय अ‍ॅम लूजर. मी जेईई करू शकली नाही. त्यामुळे आत्महत्या करत आहे. हाच शेवटचा पर्याय आहे.’ अशा दु:खद ओळींसह कितीतरी वेदना सोबत घेऊन निहारिका नावाच्या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत जीवन संपविले. ती कोटा येथे कोचिंग सेंटरमध्ये जेईई परीक्षेची तयारी करत होती. कोटा शहरातील ही आठवडाभरातील दुसरी आत्महत्या. यापूर्वी नीट परीक्षेची तयारी करणा-या महंमद जैदने आत्महत्या केली होती. असे प्रकार केवळ कोटा शहरातच होत आहेत, असे नाही. संपूर्ण भारतात किंवा जगात अशा घटना घडत आहेत आणि आपण केवळ त्याकडे स्थितप्रज्ञ भावनेने पाहत आहोत. डोळ्यांदेखत या घटना घडत आहेत. पण यासाठी संपूर्ण समाज जबाबदार नाही का? किंवा आपण एकतर खूपच स्वार्थी झालेलो असू. म्हणूनच या स्थितीवर भाष्य करताना मानसिकदृष्ट्या मुलं खंबीर नसल्याचे कारण सांगून जबाबदारी झटकत आहोत. घरात अणि घराबाहेर वावरणारे वेदनायुक्त डोळे आपल्याकडे आस लावून बसलेले असतात. मात्र आपण आपल्या महत्त्वाकांक्षेपुढे त्यांच्या वेदना पाहू शकत नाहीत. मुलांचे कष्ट आणि त्रास हा तात्पुरता असल्याचे सांगत त्यांच्यावर सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो.

पालक आणि समाज हा मुलांच्या जीवावर आपल्या महत्त्वाकांक्षेचे घोडे दामटत असतो, तेव्हा सामाजिक आणि संस्कृतीने अध:पतनाचा कळस गाठला आहे, असे समजा. अलिकडेच ‘अ‍ॅनल्स ऑफ पीडियाट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थ’ मध्ये प्रकाशित एका अभ्यासात मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न मांडले आहेत. यात अनेक वर्षांपासून सुप्त अवस्थेत असणारे नैराश्य, चिंता आणि आत्महत्येसारखे मनात घोळणारे विचार आणि व्यवहार यासंदर्भातील तीव्रतेबाबत सखोल अभ्यास करण्यात आला आहे. लॉस एंजलिस येथील कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठाचे मानसोपचारतज्ज्ञ प्रोफेसर जोसेलिन मेजा म्हणतात, आपण व्यक्तिगत पातळीवर दिसणारी लक्षणे कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित केले असले तरी आपण या स्थितीला जबाबदार असलेल्या कारणांकडे दुर्लक्ष करत आहोत. आपण प्रत्यक्षात सामाजिक रचनेकडे कानाडोळा करत आहोत. आत्महत्या ही एक व्यक्तिगत क्रिया असल्याचे गृहित धरून आपण अभ्यास करतो. मात्र त्याचवेळी ती एक सामाजिक प्रतिक्रियेचा देखील भाग आहे.

हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून आपण मुलांच्या आयुष्याचा जवळून अनुभव घेतला तर काही गोष्टी ठळकपणे दिसतील. उदा. मुलांतील तणाव आणि नैराश्य. नैराश्य हा बा घटक नाही. ती एक मनातील भावना आहे आणि त्याचे मूळ एकाकीपणा, ध्येय निश्चितीतील गोंधळ, सामाजिक दबाव यात दडलेले आहे. मुलांत बळावणारा नैराश्याचा केंद्रबिंदू हा मुळातच स्पर्धात्मक संस्कृती आहे. ती आता एवढी भेदभावपूर्ण झाली आहे की मुलाला एखाद्या मशिनप्रमाणे समजले जाते. स्पर्धेत पुढे जाण्याची संस्कृती ही त्यांच्यावर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा दबाव टाकते. स्पर्धेत पळण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते अणि त्यामुळे लाखमोलाच्या जीवनापेक्षा यशाला अधिक महत्त्व दिले जाते.

पालकच नाही तर संपूर्ण समाज, संस्कृती, वातावरण हे वेगवेगळ्या पातळीवर दबावगटाचे काम करत आहेत. ‘नेव्हर इनफ व्हेन अचिवमेंट कल्चर बिकम्स टॉक्सिक-अँड व्हॉट वुई कॅन डू अबाऊट इट’ नावाच्या पुस्तकात कुटुंब, शिक्षकांसह सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक पालकांच्या मुलाखती घेत त्यांच्या चर्चेतून काही निष्कर्ष समोर आले आहेत. अर्थात ते जाणून घेणे गरजेचे आहे. लेखिका जेनिफर ब्रेहेनी वॉलेस यांच्या मते, सतत चांगली कामगिरी करण्याच्या दबावामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. चांगल्या कामगिरीचा दबाव हा केवळ पालकांकडूनच नाही, परंतु प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हा समाजातून निर्माण झाला आहे.

सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे व्यवस्थेवर खापर फोडताना काही पालक आपल्या पाल्यांच्या इच्छा आणि आकांक्षा काय आहेत? याकडे दुर्लक्ष करतात. केवळ यश मिळवणे हा आनंदाचा मार्ग नाही, हे देखील समजून घेतले पाहिजे. असे असते तर कथित यशाचे निकष म्हणून ओळखले जाणारे ‘आयआयटी’ हे गेल्या पाच वर्षांत ३३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे साक्षीदार राहिले नसते. पैसा हा वास्तविकपणे समाधान आणि यशाचे निकष असते तर कॅलिफोर्नियात पालो आल्टो येथील तरुणांचा आत्महत्येचा दर हा राष्ट्रीय स्तराच्या तुलनेत चार पट अधिक राहिला नसता. तेथे सरासरी कौटुंबिक उत्पन्न दोन लाख डॉलर आहे. या स्थितीचे अवलोकन करण्या- साठी समाज आणि पालकांकडे अजूनही वेळ आहे.

-डॉ. ऋतू सारस्वत,
समाजशास्राच्या अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR