धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित सैनिकी विद्यालय असून या विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम काम करणा-या शासकीय ठेकेदाराकडून ६ लाख रूपयांची लाच घेताना तुळजाभवानी मंदिर संस्थानचा वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर मधुकर शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे तसेच प्रवेशद्वार, संरक्षक भिंतीचे ३ कोटी ८८ लाखाचे काम त्यांना मिळाले आहे. सदरील बांधकामाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांनी सदरील कामाचे आत्तापर्यंत २ कोटीपेक्षा जास्त बिल ठेकेदाराला तपासणी करून मिळवून दिले आहे. उर्वरित बील व अतिरिक्त सुरक्षा रक्कम ३४ लाख ६० हजार ५७९ रूपये परत मिळवून देण्यासाठी श्री. शिंदे यांनी ठेकेदाराकडे १० लाखाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ६ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
परंतु ठेकेदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. एसीबीच्या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी सापळा रचला होता. ठेकेदाराकडून बुधवारी पंचासमक्ष ६ लाख रूपये लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली केली.️ सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशीष पाटील यांचा समावेश होता.