जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावातील ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार (दि. ११) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे ६ वर्षीय बालिका आपल्या आई-वडील, दोन बहिणी, एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती. गावात राहणा-या एकाने पीडित बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवित मंगळवार (११) रोजी सायंकाळी ४ वाजता गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारातील शेतात घेऊन गेला.
त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. दुसरीकडे दुपारी ४ वाजेपासून मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला, अखेर रात्री ११ वाजता तिचा मृतदेह चिंचखेडा शिवारातील इंदासी माता मंदिराजवळील केळीच्या शेतात आढळून आला. तिच्या तोंडावर तसेच गळ्यावर जखमा दिसून आल्याने तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.
जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान अत्याचार करणा-या नराधमाला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.