भंडारा : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भंडा-याच्या साकोलीतील वाक्युद्ध समोर आले आहे. महायुतीमधील अजित पवार गट आणि भाजपामधील खदखद यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. भंडा-यातील साकोली मतदारसंघ नाना पटोले यांनी वाचवला. त्यांना महायुतीने मोठे आव्हान दिले होते. ही विधानसभा काँग्रेसच्या तावडीतून सोडविण्यासाठी यंदा भाजपने मोठी कसरत केली. राष्ट्रवादी अजित पवार गटातील जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी त्यांच्याविरोधात टफ फाईट दिली.
अर्थात त्यासाठी त्यांना भाजपात घेण्यात आले. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्यांचा २०० मतांनी पराभव झाला. हा विजय भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिव्हारी लागला. महायुतीमधील स्थानिक नेत्यांच्या मनातील ही खदखद बाहेर आली. नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द काढण्यात आले. त्याची माहिती एका ऑडिओ क्लिपमधून बाहेर आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष धनू व्यास यांनी भाजप जिल्हाध्यक्षांना फोन करत साकोली विधानसभेत काँग्रेसच्या नाना पटोलेंना महायुतीच्या उमेदवाराने दमदार लढत दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. बोलत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दल खालच्या पातळीवर शिवी देत अपशब्द वापरले.
अजित पवार गटातील जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लागलीच तिकिट देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले होते. तर काहींच्या मते, प्रचारात काहीतरी कमी पडल्यानेच ही सीट काँग्रेसला गेली. त्यावरून दोन्ही गटांतील खदखद बाहेर आली. हा विजय त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले.
ऑडिओ क्लिपमध्ये काय?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष धनू व्यास यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना बोलताना म्हटले की, नाना पटोले यांच्या विरोधात अविनाश ब्राह्मणकर उभे होते म्हणून इतकी दमदार लढत दिली.
या संभाषणात तू भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्ष पदही घेऊन टाक, असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनू व्यास यांना बोलले. अशाप्रकारे विविध अनुषंगाने राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर टोमणे मारत मनातील खदखद बोलून दाखवली..
ही व्हॉईस रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दल खालच्या पातळीवर शिवीगाळ केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून त्यांनी लाखनी पोलिसांत यासंबंधी तक्रार नोंद केली आहे.