परभणी : गायरान धारक व झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा शाखा परभणीच्या वतीने राज्य संघटक रिपाई डी. एन. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
गायरान धारकांना त्वरित त्यांच्या नावे सातबारा करून द्यावेत. मागासवर्गीय समाजावरील अन्याय, अत्याचारावर आळा बसविण्याकरिता अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. गायत्री नगर सेलू येथील झोपडपट्टी वाशीयांना पीटीआर नक्कल देण्यात यावी. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे थकीत कर्ज त्वरित माफ करावे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी या प्रमुख मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य सचिव अॅड.लक्ष्मणराव बनसोडे, मराठवाडा संघटक जयप्रकाश इंगोले, राज्य कार्यकारणी सदस्य माधव हातागळे, महिला नेत्या राणूबाई, वायवळ, शहराध्यक्ष परभणी भगवान कांबळे, विठ्ठल उजगरे, अशोक घोबाळे, निवृत्ती हत्तीअंबिरे, रामभाऊ बचाटे, डी एन झोडपे, सतीश दामोदरे आदिसह गायरान धारक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.