19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकीयसाथरोगांचे सावट

साथरोगांचे सावट

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यातच पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असल्याने साथरोगांची चलती सुरू झाली आहे. राज्यात गत पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किनारपट्टी, घाटमाथ्यावर मात्र हलक्या सरींची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व राजस्थानवर असलेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या दिशेने वाटचाल करून उत्तर अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशवरून कमी दाबाचे क्षेत्र पुढे निघून गेल्याने उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी झाला आहे. बंगालच्या खाडीत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची वाटचाल मध्य प्रदेशच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होऊ शकतो. पावसाळ्यात साथरोगांची चलती असते.

सध्या राज्यावर चिकुनगुनियाचे सावट आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिकुनगुनियाची रुग्णसंख्या तिपटीने वाढली आहे. राज्यात गतवर्षी १ जानेवारी ते १४ ऑगस्ट दरम्यान चिकुनगुनियाचे ४९७ रुग्ण आढळले होते. यंदा याच काळात १ हजार ७४४ रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपुरात २२८, कोल्हापूर जिल्ह्यात १७५, पुणे १३९, अकोला ९४ तर बीडमध्ये ७४ रुग्ण आढळले आहेत. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया अशा कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. हवामान, साचलेले पाणी, हवेतील आर्द्रता अशी पोषक स्थिती निर्माण झाली की डासोत्पत्तीचे प्रमाण वाढते. शहरी भागातील वातावरणामध्ये दिवसेंदिवस आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. प्रदूषणही वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत आहे.

अशास्त्रीय पद्धतीने होणारे शहरीकरण, योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाचा अभाव यामुळे शहरांमध्ये डासांना पोषक वातावरण निर्माण होत आहे. शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. वस्त्यांमधील गर्दी, अनधिकृत बांधकामे यामुळे अशास्त्रीय पद्धतीने वसाहती वाढत आहेत. शहराचा पसारा वाढत असताना नियोजनाचा आणि व्यवस्थापनाचा मात्र अभाव आहे. त्यामुळे एक-दोन पावसातच मुख्य रस्त्यांवर, इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी साचते. पावसाचे पाणी वाहून जायला जागाच उरत नाही. त्यामुळे डासांची पैदास वाढते. मुंबईत मुसळधार पावसानंतर अनेक आजारांनी थैमान घातले आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि एच१एन१ सारख्या आजारांना लोक बळी पडत आहेत. या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी मलेरियाचे ५५५ रुग्ण आढळले होते. यंदा ती संख्या १ हजार ८० वर पोहोचली आहे.

डेंग्यूची रुग्णसंख्या ५६२ तर चिकुनगुनियाचे ८४ रुग्ण आहेत. गॅस्ट्रोचे ५३४ तर हिपॅटायटीसचे ७२ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत यंदा ऑगस्टच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईकरांना पावसाळ्यातील आजारांचा अधिक फटका बसला आहे. पावसाळ्यातील हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने सर्दी आणि तापाच्या तक्रारी अधिक दिसून येत आहेत. पावसाळ्यात मुलांना सर्दी, जुलाब आणि त्वचाविकारांचा सर्वाधिक त्रास होतो. याशिवाय मुलांमध्ये डोकेदुखी, ताप, बद्धकोष्ठता, भूक न लागणे अशी अनेक लक्षणे दिसतात. डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुनियाचे रुग्ण पावसाळ्यात अधिक दिसतात. ही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास पालकांनी दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

पावसाळ्यात डास आणि माश्या वाढतात. माश्या अन्नावर बसतात तेव्हा अन्नातूनही अनेक रोग पसरतात. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे विषाणू आणि जिवाणू वाढतात. त्यामुळे फ्लू, दमा, अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. पालकांनी मुलांना अस्वच्छ पाण्यात खेळू देऊ नये. तसेच घराभोवती पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून पिणे केव्हाही चांगले. बदलत्या हवामानामुळे अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सतत पावसाची रिपरिप वाढल्याने सर्दी व हिवतापाचे रुग्ण वाढले आहेत. पारनेर, नगर तालुक्यातही चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. या आजारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिन पाळायला हवा. शिवाय तणनाशक, मच्छर औषध फवारणी, धूर फवारणी करणे आवश्यक आहे. पाऊस, साचलेले पाणी, कचरा यामुळे नागपुरात डेंग्यू, चिकुनगुनिया याने डोके वर काढले आहे. योग्य ती खबरदारी न घेतल्यास हे आजार गंभीर, घातक ठरू शकतात. पाणी साठवून ठेवणे, प्लास्टिक कप, टायरमध्ये पाणी साचून राहिले तर मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते.

त्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो. तसेच एका नागरिकाचे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी कामास जाणे, पर्यटनासाठी अथवा इतर बाबींसाठी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी करण्यात येणा-या प्रवासामुळेही या आजाराचा फैलाव होतो. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे गॅस्ट्रो, टायफॉईडचे रुग्ण मे महिन्यापासूनच दिसू लागतात. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता अधिक असते. हे पाणी पिल्याने जुलाब, उलटी, टायफॉईड, गॅस्ट्रोसारखे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे लहान मुले, गरोदर माता, वृद्धांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ज्या शहरांना पुराचा फटका बसला तेथे साचलेले पुराचे पाणी काढून टाकण्यासाठी संबंधित महापालिकांनी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. तशी कोणतीही व्यवस्था पूर आलेल्या ग्रामीण भागात नसल्याने तेथून मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजारांचा गंभीर धोका उद्भवू शकतो. शहर आणि ग्रामीण भाग यातील सीमारेषा इतकी पुसट आहे की, या भागातून आजाराचे प्रमाण वाढल्यास त्याचा शहरी भागालाही फटका बसू शकतो. म्हणून वेळीच खबरदारी घ्यायला हवी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR