नव्याने वाटाघाटी हव्यात, भारताचे पाकिस्तानला पत्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदी पाणी वाटपावरून नव्याने वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याला सिंधू नदी पाणी करारात बदल करावा लागणार आहे. दोन्ही देशांमधील हा जुना करार आहे. हा करार दोन्ही देशांमधील नदीच्या पाणी वाटणीबाबत आहे. या करारानंतर आता बरेच काही बदलले आहे. या करारात आता बदलाची गरज आहे, असे भारताने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात ३० तारखेला भारताने पाकिस्तानला नोटीस देऊन सिंधू नदी पाणी कराराचे पुनरावलोकन आणि दुरुस्तीची मागणी केली आहे. कराराच्या कलम २ (३) अंतर्गत दोन सरकारांमधील वाटाघाटीद्वारे वेळोवेळी त्याच्या तरतुदींमध्ये सुधारणा केल्या जाऊ शकतात. हा करार झाला, तेव्हाची परिस्थिती आता राहिली नाही. देशाची लोकसंख्या वाढली आहे, शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत आणि आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठीही पाण्याचा वापर करावा लागतो. जम्मू-काश्मीरमध्ये सतत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद या कराराच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणत आहे. या कारणास्तवही या करारावर पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे भारताने म्हटले आहे.
पाकिस्तानकडून अद्याप उत्तर नाही
भारताच्या मागणीला पाकिस्तानने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. पण पाकिस्तान भारताच्या विरोधात असेल असे मानले जाते. कारण त्याला या कराराचा खूप फायदा होतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाण्यावरून बराच काळ वाद सुरू आहे. या नव्या पावलामुळे हा वाद आणखी वाढू शकतो.