नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल ९ महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत. १९ मार्चला पहाटे त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये ब-याच अडचणी होत्या; त्यावर मात करत ते सुखरूप परत आले.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी ५ जून २०२४ रोजी बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे गेले केले. ही मोहीम केवळ ८ दिवसांची अपेक्षित होती. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हीलियम गळती आणि इतर तांत्रिक अडचणी आल्या ज्यामुळे त्यांचे परतीचे वेळापत्रक लांबले. हा प्रवास ८ दिवसापासून ९महिन्यापर्यंत पोहोचला. या दरम्यान त्यांनी अवकाशात अनेक संशोधन, प्रयोग केले.
नासाने स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा निर्णय घेतला. स्पेसएक्सच्या क्रू-९ मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयानाने ९ ऑगस्ट २०२४ रोजी करर वर यशस्वीपणे डॉक केले ज्याद्वारे त्यांच्या परतीची योजना निश्चित करण्यात आली.
सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या मूळ गाव गुजरातमधील झुलासन येथे ग्रामस्थ आणि नातेवाईक प्रार्थना करत होते. त्यांच्या परतीची बातमी ऐकून गावात आनंदाचे वातावरण आहे.
तब्बल ९ महिने अंतराळ स्थानकात अडकून राहिल्यानंतर सुखरूप परतलेल्या अंतराळवीरांच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल. सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर परतीने त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जगभर आनंद व्यक्त केला जात आहे. या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि इलॉन मस्कने प्रयत्न करून स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सुल अवकाश स्थानकावर पाठवले आणि त्यांना सुखरूप परत आणले.