न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
तगड्या पाकिस्तान संघाला अमेरिकेने चिवट झुंज देत सामना बरोबरीत सोडविला. त्यामुळे त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्येही अमेरिकेने उत्कृष्ट सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर पाकिस्तानचा ५ धावांनी पराभव केला. त्यामुळे पाकिस्तानवर पहिल्याच सामन्यात नामुष्की ओढवली. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने १८ धावा केल्या होत्या. या १८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला १३ धावाच करता आल्या. अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकर याने प्रभावी मारा करीत पाकिस्तानला दणका दिला.
तत्पूर्वी टी-२० विश्वचषत स्पर्धेत आज प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात १५९ धावा केल्या. संघाकडून सर्वाधिक धावा कर्णधार बाबर आझमने केल्या. बाबरने ४३ चेंडूत ४४ धावा केल्या. दरम्यान, शादाब खानने २५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करत पाकिस्तानला संकटातून सोडवले. सुरुवातीला अमेरिकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला अडचणीत आणले होते. मात्र बाबर आणि शादाबच्या ७२ धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला १५९ धावा करण्यात यश आले. अमेरिकेकडून नोशातुश केन्झिगेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अमेरिकेने उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामुळे मॅच टाय झाला. यामध्ये अखेर पाकिस्तानला नवख्या अमेरिकेने पराभवाची धूळ चारली.
टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली होती. त्याचा फटका पाकिस्तानला बसला. विशेष म्हणजे सुपर ओव्हरमध्येही पाकिस्तानची सुमार कामगिरी झाली. त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला.