उदगीर : प्रतिनिधी
पुणे येथे पार पडलेल्या स्कुल संसद या राज्यस्तरीय स्पर्धेत दोनशे छप्पण सहभागी शाळेतून खासदार म्हणून महाराष्ट्रात सर्वप्रथम आल्याबद्दल भक्ती सिद्धेश्वर पटणे हिचा लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने व उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ग्रंथ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भक्तीने या आगोदरही वक्तृत्व स्पर्धेत, निबंध स्पर्धेत, चित्रकला स्पर्धेत व रंगभरन स्पर्धेत अशा तब्बल चार स्पर्धेत महाराष्ट्रात सर्व प्रथम येण्याचा पराक्रम केला आहे. महाराष्ट्रात प्रथम आलेली ही तिची पाचवी स्पर्धा आहे. विविध अशा पाच स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम येऊन तीने एक सर्वगुणसंपन्न विद्यार्थिनी असल्याचे सिद्ध करत उदगीरचे नाव महाराष्ट्रात उंचावले आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नुकताच लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने रघुकुल मंगल कार्यलयामध्ये भव्य असा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये कु. भक्तीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक संस्थेचे अध्यक्ष वट्टमवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्यवाह शंकरराव लासूने, शिक्षण अधिकारी शफी शेख , सरकारी वकील शिवाजी बिरादार, शालेय समितीचे अध्यक्ष संतप्पा हुरदळे, प्रकाश येरमे, संस्थेचे सन्मानीय सदस्य शनमुखानंद मठपती, लालबहादूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कोपले, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, श्रीपाद सीमंतकर, भक्तीच्या मार्गदर्शिका, आदर्श शिक्षिका अनिता येलमट्टे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमचे सूत्रसंचलन चव्हाण यांनी केले मुख्याध्यापक कोपले यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.