नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची जोरदार चर्चा असते. काही दिवसांअगोदरच राष्ट्रध्वजाची जोरदार विक्री होते. पण या अभियानावर काँग्रेसने चीनशी कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अभियानातील काही मुद्यांवर काँग्रेस गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बोट दाखवत आहे. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर दुटप्पीपणाचा गंभीर आरोप केला आहे.
सोनिया गांधींनी ‘द हिंदू’ वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. त्यात सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारने हाताने बनवलेला खादीचा तिरंगा वापरायचे बंद केले. सरकार पॉलिस्टर तिरंगा वापरत आहे. पॉलिस्टर चीनमधून आयात केले जात आहे. सरकारने खादीची खरेदी कमी केल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला. हाताने तयार केलेल्या खादीच्या वस्तूंसाठी जागतिक बाजारपेठ तयार करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.
राहुल गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी हर घर तिरंगा अभियानाचे चीन कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. त्यांनी फेसबूक पोस्ट लिहिली होती. चीनसोबत पंतप्रधानांनी तिरंग्याचा सौदा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
त्यानंतर काँग्रेसने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातात तिरंगा असल्याचा फोटो डीपीवर ठेवला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खादीचा वापर कमी होत असल्याचा आरोप मोदी सरकारवर केला आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी खादीची विक्री वाढली होती. पण आता त्यात घट झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
चीनवर त्यामुळेच मौन : चीनने भारतीय सीमेत अनेकदा घुसखोरी केली, पण मोदी गेल्या काही वर्षात काहीच बोलले नाहीत. ते मौन धारण करतात. देशाच्या तिरंग्यासाठी खादीचा वापर न करता चीनमधून आयात केलेल्या पॉलिस्टरचा वापर वाढला आहे. एकीकडे चीन देशाच्या सीमेवर घुसखोरी करत असताना चीनकडून पॉलिस्टरची आयात का वाढत आहे, असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात येत आहे. या मुद्यावरुन सध्या राजकारण तापले आहे.