हाडोळती : वार्ताहर
हिप्पळगाव तालुका अहमदपूर येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या पावसाळ्यात गळत असून वर्गामध्ये पाणी साठत आहे. भिंती ओल्या झाल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना ओल्या जागेवर बसावे लागत आहे. स्लॅब कोसळण्याची भिती असून तो कोसळणार काय याची भीती शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांंना वाटत आहे.
सदरील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.ओल्या जागेवर बसून व दुषीत वातावरणामुळे विद्यार्थी आजारी पडत आहेत. यामुळे पालकांमध्येचिंतेची व संतापाची लाट पसरली आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील शाळेला एकूण सात वर्ग खोल्या असून त्यातील एक ऑफिस व तीन वर्ग खोल्या पावसामुळे गळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या इमारतीपासून धोका असून संबंधित शिक्षण विभागांने या शाळेच्या इमारतीकडे त्वरित लक्ष देऊन होणारी दुर्घटना टाळावी. सदरील शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. शाळेची इमारती व स्लॅब गळत आहे तेव्हा ते दुरुस्त करून घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आमची मुले आम्ही शाळेतुन काढून घेणार असल्याचे सांगितले आहे.