26.3 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रहे तर निकम्मे सरकार

हे तर निकम्मे सरकार

शेतकरी आत्महत्येवरून राऊतांचा संताप

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाने पुरस्कार देऊन गौरवलेल्या कैलास नागरे या युवा शेतक-याने सणाच्या दिवशी आत्महत्या केली. आपल्या या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरले आहे. हे निकम्मे सरकार असून, आपल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, याची या सरकारला लाज वाटत नाही का, असा संतप्त सवाल राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, राज्य शासनाचे युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. हा शेतकरी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील आहे. माझ्या आत्महत्येस सरकार कारणीभूत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी लढा देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देण्यात आल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आत्महत्येवरून विद्यमान महायुती सरकारवर घणाघाती टीका केली आहे. हे सरकार ढोंगी, दुतोंडी आहे. त्यांना कशाचेही काहीही पडले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर आम्ही यापूर्वी देखील बोललो असल्याचे सांगतानाच काल घडलेली घटना दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. या विषयावर आधारित अग्रलेख देखील ‘सामना’ वृत्तपत्रात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतक-यांचे प्रश्न, पाणी प्रश्न यावर हे सरकार काहीही बोलत नाही. पण त्यांना बाकी सगळ्या मुद्द्यांवर बोलायला वेळ आहे, असा टोला राऊतांनी लगावला. शेतकरी आत्महत्येवर बोलायला सरकारला वेळ नाही. म्हणूनच आज शेतक-यांवर ही वेळ आली आहे. कैलास नागरे यांनी देखील मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांशी बोलायचा प्रयत्न केला होता, पण त्यांना त्यात यश आलं नाही. त्यामुळेच त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. ही केवळ कैलासची आत्महत्या नाही तर सरकारने त्याच्या माध्यमातून शेकडो लोकांची केलेली हत्या आहे. कैलासच्या आत्महत्येचे पातक या सरकारवर आहे.

सरकारने राज्याची माफी मागावी
हे सरकार शेतक-यांचे प्रश्न कधी सोडवणार आहे? आठवत नसेल तर त्यांनी आपला जाहीरनामा पुन्हा वाचावा, असा सल्लाही राऊतांनी त्यांना दिला. खरं तर या सरकारने शेतकरी आत्महत्येसाठी राज्याची माफी मागितली पाहिजे. निवडणूक जुमला म्हणून त्यांनी अनेक घोषणा केल्या पण त्या पूर्ण नाही केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR