अकोला : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेने विरोधकांना घाम फोडल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात येत आहे. या योजनेमुळे महाविकास आघाडीचे अवसान गळाल्याचा दावा सत्ताधारी गोटातून करण्यात येत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलतात आणि फॉर्मवर स्वत:चे थोबाड लावतात, असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. अकोला येथे ते बोलत होते.
रणधीर भाऊंनी मला सांगितले, एक-दीड तास बोला. मी जर प्राध्यापक असतो तर नक्कीच ५० मिनिटे बोललो असतो. माझी सवय आहे मोजकंच बोलायचं, आवश्यक आहे तेवढंच बोलायचं. अकोलाबद्दल अनेक जण शंका व्यक्त करत होते. पण तुम्ही विजयाची परंपरा इथे कायम ठेवली, असे कौतुक त्यांनी केले.
सावत्र भावापासून सावध राहा
लाडक्या बहिणीचा त्रास आता मविआला होऊ लागला. ते कोर्टात गेले. तुम्ही तोंडात सोन्याचा चमचा धरून जन्माला आले पण १५०० रुपयांचे महत्त्व आमच्या गृहिणीला विचारा. पण आमच्या बहिणीच्या लक्षात आलं की हे सावत्र भाऊ आहेत. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. सप्टेंबरमध्ये आपण बहिणीला हप्ता देणार आहोत.