22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरहैदराबाद मुक्तिसंग्रामात औराद शहाजनीचे योगदान

हैदराबाद मुक्तिसंग्रामात औराद शहाजनीचे योगदान

निलंगा : प्रतिनिधी
हैदराबाद मुक्तिसंग्रामात आर्य समाजाच्या माध्यमातून औराद शहाजानी येथील पंडित वीरभद्र आर्य व त्यांचे सहकारी आणि परिसराने मोलाचे योगदान दिले असून हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अज्ञात पैलूंवर प्राथमिक साधनांच्या सहाय्याने संशोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लातूर येथील ज्येष्ठ विचारवंत तथा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांनी केले.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील इतिहास विभाग व भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामात मराठवाड्याचे योगदान’ या विषयावर दि.१६ रोजी आयोजित एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शारदोपासक शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बगदुरे उपस्थित होते. मंचावर प्रा.सतीश कांबळे, बोरसुरी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मल्लिकार्जुन चाकोते, प्रभादेवी आर्य, संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, संचालक किशनरेड्डी भिंगोले, शिवाजीराव जाधव, मडोळय्या मठपती, दगडू गिरबने, प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील हे उपस्थित होते.
डॉ.रोडे यांनी औराद शहाजानी व परिसरातील अनेक घटनाक्रमाचा आढावा घेत स्वामी रामानंद तीर्थ यांनी देशासाठी व देश हितासाठी मनाशी केलेला संकल्प आयुष्यभर पाळला, पूर्ण केला. त्याप्रमाणेच वर्तमान काळातील युवा पिढीनेही मनाशी ठरवलेले संकल्प पूर्ण केले पाहिजेत. आपल्या उक्ती व कृती यामध्ये अंतर पडता कामा नये. उद्घाटनपर मार्गदर्शनात प्रा.सतीश कांबळे यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील मराठवाड्याच्या मौलिक योगदानाचा आढावा घेत महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीविषयी समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात रमेश बगदुरे यांनी प्रत्येकास आपल्या देशाच्या इतिहासाचे स्मरण तर झाले पाहिजेच शिवाय आपापल्या क्षेत्रात राष्ट्रोपयोगी कार्य करुन इतिहास निर्माण केला पाहिजे. यावेळी स्वातंत्र्यसेनानींचे कुटूंबीय प्रभावती आर्य, प्रकाशंिसह कच्छवा, धोंडीराम माळवदकर व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मल्लिकार्जुन चाकोते यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. चर्चासत्रा भाऊसाहेब उमाटे, प्रा.गीतांजली बोराडे, डॉ.ओमशिवा लिगाडे, डॉ.सुभाष बेंजलवार, प्रा.कल्याणप्पा नावदगी यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या समारोप अध्यक्ष संस्थेचे संचालक शिवाजीराव जाधव होते व तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.सदाशिव दंदे मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.बालाजी गव्हाळे, महेश केंद्रे यांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. यावेळी एकूण ५६ शोधनिबंधाच्या अंकाचे विमोचन करण्यात आले. राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ.सचिन हंचाटे यांनी केले. तर सूत्रसंचलन डॉ.विजयकुमार पवार व डॉ.भगवान कदम व आभार डॉ.सुचिता किडीले यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR