25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeलातूर२,०१,२७८ बालकांना वाटप करणार झिंक गोळ्या 

२,०१,२७८ बालकांना वाटप करणार झिंक गोळ्या 

लातूर : प्रतिनिधी
ज्या घरात ५ वर्षापर्यंतच्या बालकांना अतिसार असेल अशास बालकांना ओआरएसचे दोन पाकीटे देण्यात येणार आहेत व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील १ लाख ८५ हजार २७८ व शहरी भागातील १५ हजार ७४७ अशा एकूण २ लाख १ हजार २५ बालकांचा समावेश आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत गावात प्रत्येक घरोघरी पालकांना एकत्रीत करुन ओ. आर.एस. द्रावण तयार करुन दाखविले जाणार आहे. तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून हात धुण्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले जाणार आहे.
राज्यातील अर्भक मृत्यू दर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण आहे.  सुमारे ५.८ टक्के बालके अतिसरामुळे दगावतात. बाल मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. यामुळे सन २०१४ ते २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवाड्याच्या यशस्वीतेनंतर यावर्षी अतिसरामुळे होणारे बालमृत्यू शुन्य करणे हे उद्दिष्ट ठेवून जिल्ह्यात ६  ते २१ जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे.
या पंधरवाड्याचे उद्दिष्ट हे अतिसार असलेल्या सर्व मुलांना ओआरएस व झिंकचे वाटप करणे, पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे समुपदेशन करणे व अतिजोखमीचे क्षेत्र आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत करणे आहे. यासाठी पंधरवडा कालावधीत जनजागृती, अतिसरामध्ये घ्यावयाची काळजी, तसेच क्षारसंजीवनी (ओआरएस) व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करावा? याबाबत अशा स्वयंसेविकांमार्फत प्रात्यिक्षिके करुन दाखविण्यात येणार आहेत.
तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य संस्थेत ओर. आर. टी. कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. ६ ते २१ जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा या मोहिमेतंर्गत सर्व पालकांनी ५ वर्षापर्यंच्या बालकांमध्ये होणारे अतिसाराचे प्रतिबंध व उपायायोजना याबाबत माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले पी. एम. यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR