21.4 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूर२० लाख ३६ हजार मतदार निवडणार ६ आमदार

२० लाख ३६ हजार मतदार निवडणार ६ आमदार

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील २० लाख ३६ हजार ५६७ मतदार मतदान करणार असून आपल्या मतांनी जिल्ह्यातील सहा आमदारांची निवड मतदार करतील.
लातूर जिल्ह्यात लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्याकडून वारंवार आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे. तर निवडणुक लढण्यास इच्छूक असणा-या विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात संपर्क, बैठकांवर जोर दिला आहे. दि. २२ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर दि. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होतील. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. दि. २० नोव्हेबर रोजी प्रत्यक्ष मतदान होईल आणि दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकुण २० लाख ३६ हजार ५६७ मतदार आहेत. यात १० लाख ६२ हजार ७३ मतदार पुरुष आहेत.  महिला मतदारांची संख्या ९ लाख ७१ हजार ५८० एवढी आहे. सैनिक मतदार २ हजार ८५३ आहेत. तृतीयपंथी मतदार ६१ आहेत. १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ५४ हजार ६७४ इतकी आहे. ८५ वर्षे वयावरील मतदार ३६ हजार ५६ आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या १८ हजार ६३९ एवढी आहे. हे २० लाख ३६ हजार ५६७ मतदार जिल्ह्यातील सहा आमदार निवडणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २४० क्षेत्रिय अधिकारी, ४२ भरारी पथके राहातील. याशिवाय ३६ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम, १८ व्हिीडीओ शुटिंग पथके तैनात असणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR