लातूर : प्रतिनिधी
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत राबवली जाणारी प्रवेशप्रक्रियेची लॉटरी जाहीर झाली आहे. लातूर जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या सहा हजार ५३२ अर्जांपैकी २ हजार १२० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना घराजवळील शाळेत मोफत प्रवेश मिळणार असून याबाबतचे एसएमएस पालकांना पाठविण्याचे काम दि. १४ फेब्रुवारीपासून सूरु झाले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमानूसार २५ टक्के प्रवेश हे वंचित व दुर्बल घटकातील मुली व मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. दरवर्षी ही प्रवेशप्रक्रिया रेंगाळते. त्यामुळे यंदा तीन ते चार महिने आधी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २०७ शाळांमधील २ हजार १७३ जागांसाठी तब्बल ६ हजार ५३२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे कोणाकोणाचे प्रवेश निश्चित होणार, याकडे अनेक पालकांचे लक्ष लागले होते. लातूर जिल्ह्यातील २ हजार १२० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.
यात लातूर शहर आणि लातूर तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी आहेत. आरटीईची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पद्धतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतीक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्जांची स्थिती पाहत असताना पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता पुन्हा प्रयत्न करावा. निवड यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.
निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जावे. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट आपापल्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी. पालकांनी आपल्याबरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंटदेखील घेऊन जावी. आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित झाला आहे, याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ या वर्षाकरीता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील. परंतू, पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबुन न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जांची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस येणार आहेत.