23.9 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeलातूर३०० हॉस्पिटलमध्ये आज महाआरोग्य शिबिर

३०० हॉस्पिटलमध्ये आज महाआरोग्य शिबिर

लातूर : प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासराव  देशमुख यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून आज दि. १४ ऑगस्ट रोजी  लातूर मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, निमा असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन तसेच विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त्त विद्यमाने लातूर शहरासह जिल्ह्यातील ३०० हून अधिक हॉस्पिटलसमध्ये महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून हजारो गरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जाणार असल्याची माहिती मंगळवारी डॉक्टर्स संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात अली.
महाआरोग्य शिबिराचे हे १२ वे वर्ष आहे. लोकनेते  विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त मागच्या सलग १२ वर्षांपासून जिल्ह्यातील किमान २२५ ते २५० विविध हॉस्पिटल्सच्या माध्यमातून रुग्णसेवेचा हा महाआरोग्य शिबिर रुपी यज्ञ सुरु आहे. दरवर्षी या महाआरोग्य शिबिरात हजारोंच्या संख्येने रुग्णांची नि:शुल्क तपासणी , उपचार केले जातात. मागच्या वर्षीच्या म्हणजे वर्ष २०२३ च्या महाआरोग्य शिबिरात  तब्बल १५  हजारांहून अधिक रुग्णांची  तपासणी करण्यात आली होती. शेकडो रुग्णांच्या  अत्यंत माफक, सवलतीच्या दरात  शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. विकासरत्न विलासराव  देशमुख  यांनी ‘जे  जे नवं ते लातूरला हवं’,  हा  मंत्र आपल्या जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जोपासला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज लातूरच्या वैद्यकीय क्षेत्राने रुग्णसेवेची अत्युच्च  पातळी गाठली आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख आज आपल्यात नाहीत, तरीही त्यांच्यावरील प्रेमापोटी हा यज्ञ अविरतपणे सुरु आहे. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्याबाबतीत   एलआयसीची ‘जिदगी के साथ भी.. जिंदगी के बाद  भी’, हे स्लोगन शंभर टक्के लागू पडते, असे म्हटल्यास ते अजिबात चुकीचे ठरणार नाही. विकासरत्न विलासराव  देशमुख आणि लातूरचे डॉक्टर यांचे वेगळेच नाते  निर्माण झाले होते. जे आजही कायम आहे. त्यांच्याप्रमाणेच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज धिरज देशमुख  यांनीही डॉक्टर मंडळींशी असलेले हे नाते  पुढील काळात कायम जपण्याचे काम केले आहे व करत आहेत.  यावर्षीच्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातूनही पंधरा  हजारांपेक्षाही अधिक गरजू रुग्णांना मोफत तपासणी, उपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. आवश्यक त्या प्रमाणात मोफत औषधीही उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व वैद्यकीय संघटना प्रयत्नशील आहेतच.
महाआरोग्य शिबिरादरम्यान रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षताही संयोजन समितीच्या वतीने बाळगली जात असल्याची माहिती मेडिकल असोसिएशन लातूरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, सचिव डॉ. गणेश बंदखडके तसेच शहर समन्वयक डॉ. कल्याण बरमदे , डॉ. अशोक पोद्दार,  ग्रामीण समन्वयक  डॉ. दिनेश नवगिरे, यांनी दिली.   मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी प्रास्ताविकात या महाआरोग्य शिबिराच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली. सूत्रसंचलन  डॉ. संगमेश चवंडा यांनी तर डॉ. गणेश बंदखडके यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR