लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील १११ ग्रामपंचायती, अंगणवाडया, जिल्हा परिषदेच्या शाळा १५ वा केंद्रीय वित्त आयोगातून विजबील मुक्त करण्यासाठी लातूर पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतींना सुचना केल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींनी ३२ शाळा, अंगणवाडया व ग्रामपंचायतींच्या छतावर सोलार पॅनल बसवल्याने त्या विजबील मुक्त झाल्या आहेत.
लातूर तालुक्यातील १११ ग्रामपंचायती आत्मनिर्भर करण्यासाठी लातूर पंचायत समितीच्या प्रशासनाने गावातील कर वसूलीला प्रोत्साहान देण्याच्या बरोबरच वीजबीलाच्या बाबतीतही ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडया व उपकेंद्र अत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींना तशा सुचनाही दिल्या आहेत. १५ वा केंद्रीय वित्त आयोगाच्या अबंधित निधीतून १४ ग्रामपंचायती, १९ जिल्हा परिषदेच्या शाळा, ८ अंगणवाडया, १ उपकेंद्रावर सोलार सौर ऊर्जा पॅनल बसवून विज बिल मुक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी दिवसभर कार्यालयीन कामकाजासाठी विज उपलब्ध होते. सुर्यास्तानंतर दोन तास विजेचा सदर कार्यालयांना पुरवठा होत आहे.
मार्चअखेर पर्यंत ग्रामपंचायती वीजबील मुक्त होतील
लातूर तालुक्यातील १११ पैकी २९ ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडया, ग्रामपंचायतीवर १५ वा केंद्रीय वित्त आयोगाच्या अबंधित निधीतून सोलार पॅनल बसवून विजबिल मुक्त केल्या आहेत. तसेच पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी सौर पॅनल बसवून सौर विजेचा लाभ घेता येतो. १ किलो वॅटचे सोलार पॅनल बसवल्यास ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडयांना दिवसा शासकीय कामासाठी विज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विजबिल मुक्त ग्रामपंचायती मार्च अखेर पर्यत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती लातूर पं. स. चे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी दिली.