27.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeराष्ट्रीय३२ लाखांना विकला गेला ‘नीट’चा पेपर!

३२ लाखांना विकला गेला ‘नीट’चा पेपर!

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा – अंडर ग्रॅज्युएट (नीट-यूजी) पेपर लीक प्रकरणात पाटणामध्ये अटक केलेल्या अनुराग यादव या विद्यार्थ्याने या परीक्षेची प्रश्नपत्रिका ३० ते ३२ लाख रुपयांना विकली गेली, असा धक्कादायक कबुलीजबाब पोलिसांना दिला आहे.

अनुरागने पोलिसांना सांगितले की, दानापूर नगर परिषदेतील त्याचा कनिष्ठ अभियंता काका सिकंदर यादवेंदू याने त्याला परीक्षेत पास होण्याची हमी दिली होती. परीक्षेच्या आदल्या दिवशीच फुटलेली प्रश्नपत्रिका देऊन प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून पाठ करून घेण्यात आली.
पेपरफुटीत सहभागी विद्यार्थ्यांची राहण्याची सोय पाटणा येथील नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (एनए- चएआय) च्या अतिथीगृहात करण्यात आली होती. येथील एन्ट्री रजिस्टरमध्ये अनुरागच्या नावापुढे कंसात ‘मंत्री जी’ असे लिहिलेले होते, असेही तपासात समोर आले आहे. यामुळे या प्रकरणात राजकीय सहभागाचा संशय व्यक्त होत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनुराग, सिकंदर यादवेंदू, नितीश कुमार व अमित आनंद यांना आतापर्यंत अटक झाली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे चौघेही पेपरफुटी प्रकरणाचे सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. या चौघांनीही परीक्षेच्या एक दिवस आधी काही उमेदवारांसाठी प्रश्नपत्रिका तयार केल्याची कबुली दिली. फुटलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी ३० ते ३२ लाख रुपयांना खरेदी केली.

कोटामध्ये नीटची तयारी करणा-या अनुरागच्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, सिकंदरने त्याच्यासाठी नीट पेपर्सची आधीच व्यवस्था केली होती. त्यामुळे त्याला कोटाहून समस्तीपूरमध्ये बोलावण्यात आले. तेथे अमित व नितीशची ओळख करून देण्यात आली. या दोघांनी त्याला फुटलेली प्रश्नपत्रिका व लक्षात ठेवण्यासाठीची उत्तरे पुरविली. ५ मे रोजी परीक्षेत तेच प्रश्न विचारले होते. मात्र, परीक्षेनंतर अनुरागला अटक झाली.

अमित व नितीशनेच आपल्याला पेपर लीकची माहिती देऊन एका पेपरची किंमत ३० ते ३२ लाख रुपये सांगितली होती. नंतर आपण चार विद्यार्थ्यांना पेपरफुटीची माहिती दिली. ४ मे रोजी आपण लीक झालेल्या प्रश्नांची उत्तरे पाठ करणे सुरू असलेल्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो, असे यादवेंदूने कबूल केले आहे. दरम्यान, यादवेंदूने प्रत्येक विद्यार्थ्याकडून ३२ ऐवजी ४० लाखांची मागणी केली. मात्र, तो पोलिसांच्या तावडीत सापडला. नितीश व अमित यांनीही पेपरफुटीतील सहभागासह यादवेंदूला सहकार्य केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, यादवेंदूच्या अटकेनंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना फुटलेली प्रश्नपत्रिका दिली गेल्याच्या ठिकाणावर छापा मारला. येथे जळालेल्या प्रश्नपत्रिकांचे तुकडे सापडले होते..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR