सांगली : प्रतिनिधी
सांगलीत ४०० वर्षे जुना वटवृक्ष पावसामुळे उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. जो वृक्ष वाचवण्यासाठी गावक-यांनी मोहीम राबवली. गावक-यांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्गही थोडा वळवण्यात आला.
मात्र आता तेच झाड पडल्याने गावकरी दु:ख व्यक्त करत आहेत. वटवृक्ष वाचवण्यात यश आल्यानंतर तेव्हा आंदोलक आणि गावक-यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला होता.
सांगली जिल्ह्यातल्या भोसे गावच्या हद्दीत असणारे ४०० वर्षे जुने झाड उन्मळून पडले. चार वर्षांपूर्वी रत्नागिरी -नागपूर महामार्गाच्या आडवे हे झाड येत असल्याने ते तोडले जाणार होते. मात्र झाड वाचवण्यासाठी वृक्षप्रेमींनी मोहीम उघडली. राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही यासाठी पाठपुरावा केला. शेवटी झाड न तोडण्याचा निर्णय झाला आणि महामार्ग वळवला गेला.
भोसे गावाजवळ असणा-या यल्लमा मंदिर परिसरात ४०० वर्षे जुना वटवृक्ष होता. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर असलेला हा वटवृक्ष कोसळल्याने आता पर्यावरणप्रेमींनी दु:ख व्यक्त केले आहे. ४०० ते ५०० मीटर परिसरात पसरलेला हा वटवृक्ष पंढरपूरकडे जाणा-या वारक-यांसाठी, रस्त्याने जाणा-या वाटसरूंसाठी सावली देणारा होता. हजारो पक्ष्यांचे या वृक्षावर घरटे होते. वडाच्या झाडाचे आयुर्मान १ हजार वर्षांपर्यंत असते. पर्यावरणासाठी त्याचे फायदे असतात. तसेच ४०० वर्षे जुना वृक्ष असल्याने पुन्हा इतका मोठा वृक्ष तयार व्हायला ४०० वर्षे लागतील. त्यामुळे हा वृक्ष तोडू नये अशी मागणी तेव्हा केली गेली होती.