26.6 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमुख्य बातम्याअंतराळात अंकुरले घेवड्याचे बियाणे!

अंतराळात अंकुरले घेवड्याचे बियाणे!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास रचण्यात यश मिळवले. यावेळी अंतराळात वनस्पती संगोपन आणि संवर्धनाचा विषय आहे. इस्रोने आपल्या पीएसएलव्ही सी-६० च्या पीओएम-४ मोहिमेद्वारे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये वालाचे (घेवडा) बियाणे वाढविण्यात यश मिळवले आहे.

हा अनोखा प्रयोग म्हणजे विज्ञान विश्वातील एक मोठे पाऊल तर आहेच, पण भविष्यात अंतराळात मानवी जीवन शाश्वत करण्याच्या दिशेने एक भक्कम पाया आहे. त्यामुळे अंतराळात वनस्पती वाढविण्यासाठी इतके प्रयत्न का केले जातात आणि हे प्रयोग कितपत यशस्वी होऊ शकतात, असा प्रश्न पडतो.

पीओएम-४ मोहिमेत एकूण २४ प्रगत पेलोड होते. कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज (क्रॉप्स) द्वारे ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य करण्यात आली. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने याची निर्मिती केली होती. या संशोधनादरम्यान आठ वालाचे (घेवडा ) बियाणे बंद पेटीत ठेवण्यात आले होते, जिथे तापमान आणि इतर परिस्थितीकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वनस्पती कशा उगवतात आणि वाढतात हे समजून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला.

हा प्रयोग करण्यासाठी अद्ययावत मॉनिटरिंग तंत्रज्ञानाची उपकरणे बसविण्यात आली होती. उदाहरणार्थ, चांगल्या प्रतीचे कॅमेरे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मोजणारे सेन्सर, आर्द्रता शोधक, तापमान मॉनिटर आणि जमिनीतील ओलावा शोधण्याची उपकरणे यांचा समावेश करण्यात आला आहे. या सगळ्यातून सातत्याने प्लांटचा मागोवा घेण्यात आला. चार दिवसांत घेवड्याचे बियाणे यशस्वीरीत्या उगवले असून लवकरच त्यांना पाने येण्याची शक्यता आहे.

अंतराळात वनस्पती वाढविण्यामागचा मुख्य हेतू दीर्घकाळ टिकणा-या अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि मानसिक आरोग्यावर उपाय शोधणे हा आहे. जेव्हा अंतराळवीर काही महिने किंवा वर्षे अंतराळात राहतात तेव्हा त्यांना ताज्या अन्नाची कमतरता भासू शकते. अशा वेळी रोपांची लागवड हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो.

याशिवाय वनस्पती कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करतात. यामुळे अंतराळयानातील हवेची गुणवत्ता सुधारेल. भविष्यात मंगळ आणि चंद्रासारख्या ग्रहांवर स्थायिक होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेनेही हा प्रयोग एक मोठे पाऊल आहे. अंतराळात स्वयंपूर्ण मानवी वस्ती प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतराळ शेतीच्या विकासाला वनस्पतींच्या वाढीमुळे नवी दिशा मिळाली आहे. अवकाशात वनस्पतींची वाढ संथ गतीने होते आणि अनेकवेळा त्यांना योग्य पोषण मिळत नाही. असे असले तरी इस्रोचे हे पाऊल अंतराळात मानवी वसाहती वसवण्याच्या दिशेने मोठा बदल ठरू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR