18.1 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रअंबानींनी घेतली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट

अंबानींनी घेतली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : प्र्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मंगळवारी रात्री ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीनंतर लगेच त्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. रात्री एक वाजता मुकेश अंबानी ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले होते. त्यामुळेच या भेटीमागील नेमकं कारण काय याबद्दल उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

रात्री साडेदहाला ‘मातोश्री’वर पोहोचले
मुकेश अंबानी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचले. त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर सुमारे दोन तास चर्चा केली. रात्री साडेदहा ते साडेबारा दरम्यान मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी ‘मातोश्री’ निवासस्थानावर होते. दोन तासांनंतर अंबानींचा ताफा ‘मातोश्री’ या निवासस्थानावरून बाहेर पडला. या भेटीदरम्यान राजकीय क्षेत्रात सक्रिय नसलेले तेजस ठाकरेही उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे.

‘मातोश्री’वरून ‘वर्षा’वर
तसेच या भेटीनंतर अंबानींचा ताफा थेट ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी गेला. या दोघांच्या भेटीदरम्यान अंबानींनी नेमकी काय आणि कोणत्या विषयावर चर्चा केली यासंदर्भातील माहिती समोर आली असून ती अजून गुलदस्त्यातच आहे. ‘वर्षा’ निवासस्थानीही अंबानी पिता-पुत्र बराच वेळ होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याचे समजते. मात्र नेमकी कशावर चर्चा झाली हे सांगण्यात आलेले नाही.

एका रात्रीत मोठी राजकीय घडामोड
एका रात्रीत अंबानींनी दोन प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्याने राज्यात काही मोठी राजकीय घडामोड घडणार की काय यासंदर्भात दबक्या आवाजामध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र अंबानींनी उद्धव ठाकरेंबरोबर तसेच त्यानंतर एकनाथ शिंदेंबरोबर झालेल्या वेगळ्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR