मुंबई : वृत्तसंस्था
चीनमध्ये आढळलेल्या ‘एचएमपीव्ही’ विषाणूचा फैलाव हळुहळू इतर देशांमध्येही होत आहे. या विषाणूचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. या चिनी विषाणूने जगातील अव्वल २० श्रीमंतांमध्ये गणल्या जाणा-या मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे तब्बल ५२ हजार कोटी रुपये हडप केले आहेत.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातून ही बाब समोर आली. मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीमुळे, या दोन्ही अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली. या घसरणीचे कारण ‘एचएमपीव्ही’ विषाणू आहे. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी, यांच्या संपत्तीत एकत्रितपणे ५२ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.
मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट : मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २.५९ अब्ज डॉलर्स, म्हणजेच २२ हजार कोटी रुपयांहून अधिकची घट झाली आहे. त्यामुळेच त्यांची एकूण संपत्ती ९०.५ अब्ज डॉलर्सवर आली आहे. विशेष बाब म्हणजे, २०२५च्या पहिल्या सहा दिवसांतच अंबानींच्या संपत्तीत ११९ मिलियन डॉलर्सची घट झाली आहे. सध्या मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर आहेत.
गौतम अदानी यांची संपत्तीही कमी : आशियातील दुस-या क्रमांकाचे आणि जगातील १९ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत ३.५३ अब्ज डॉलर्स, म्हणजेच ३० हजार कोटी रुपयांहून अधिकची घट झाली आहे. यानंतर त्यांची एकूण संपत्ती ७४.५ अब्ज डॉलरवर आली आहे. विशेष म्हणझे, २०२५ च्या पहिल्या काही दिवसांतच त्यांच्या संपत्तीत $४.२१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.