नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणले जाणारे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना मोठा झटका बसला. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी १०० अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर पडले आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत या दोघांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड घसरणीमुळे श्रीमंतांच्या यादीत दोन्ही उद्योगपती खूप खाली आले आहेत.
मुकेश अंबानी यांची संपत्ती जुलै २०२४ मध्ये $१२०.८ अब्ज होती, जी आता डिसेंबर २०२४ मध्ये $९६.७ बिलियन झाली आहे. ही घसरण प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल आणि ऊर्जा विभागांची कमकुवत कामगिरी आणि वाढत्या कर्जामुळे झाली आहे. कंपनीच्या व्यवसाय विस्ताराबाबत गुंतवणूकदारांमध्येही चिंता वाढली आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट होण्यामागे यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (डीओजे) चा तपास आणि हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाचा मोठा वाटा आहे. हिंडेनबर्ग अहवालातील फसवणुकीच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या प्रतिमेला खूप तडा गेला. जून २०२४ मध्ये अदानींची संपत्ती १२२.३ अब्ज डॉलर्स होती, जी आता डिसेंबर २०२४ मध्ये केवळ ८२.१ अब्ज डॉलर्सवर आली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत वॉलमार्टचे वॉल्टन कुटुंब २०२४ मध्ये $ ४३२.४ अब्ज संपत्तीसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी मध्य-पूर्वेतील शाही कुटुंबे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनाही मागे सोडले आहे. तर, अंबानी आणि मिस्त्री कुटुंबे, या यादीत अनुक्रमे आठव्या आणि तेविसाव्या क्रमांकावर आहेत. अदानींना या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे, या यादीमध्ये पहिल्या पिढीतील उद्योगपतींचा समावेश केला जात नाही.
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेली घसरण भारतीय उद्योगासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. दोन्ही उद्योगपतींना त्यांचे व्यावसायिक साम्राज्य स्थिर करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलावी लागतील, असे गुंतवणूकदार आणि उद्योग तज्ज्ञांचे मत आहे.