36.1 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रअकोल्यात गस्त घालणा-या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला

अकोल्यात गस्त घालणा-या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला

अकोला : गस्तीवर असलेल्या पोलिसांवर अज्ञात दरोडेखोरांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी हवेत गोळीबार करून पळ काढला. अकोला शहर, अकोला जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे आटोक्यात यावे, या अनुषंगाने अकोला पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

यावेळी अकोल्यातील उरळ पोलिसांवर गस्तीदरम्यान चार तरुणांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन्ही पोलिस कर्मचारी बचावले आहेत. हा गोळीबार हवेत केल्याचे सांगण्यात येत असून अकोला जिल्ह्यातील मांजरी कंचनपूर रस्त्यावर रात्री पावणेदोनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

उरळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोपाल ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार उरळ पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. यामध्ये हातरूण आणि मांजरी भागातही पेट्रोलिंग वाढवली आहे. दरम्यान काल रात्री हातरूणचे बीट जमादार दिनकर इंगळे आणि वाहनचालक मुंडे हे चारचाकी पोलिस वाहनातून पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर मोटारसायकलवर असलेल्या लोकांनी गोळीबार केला.

या घटनेत दोन्ही पोलिस कर्मचारी बचावले आहेत, असे ढोले यांनी कळवले आहे. ते म्हणाले की, काल मध्यरात्रीनंतर पावणेदोनच्या सुमारास पोलिस कर्मचारी दिनकर इंगळे आणि वाहनचालक मुंडे हे मांजरी-कंचनपूर रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान कंचनकडून दोन मोटारसायकली येत असताना दिसल्या. तेवढ्यात दोन्ही मोटारसायकलस्वारांनी पोलिसांचे वाहन पाहताच आपले दुचाकी वाहन वळवले आणि पळू लागले.

इंगळे यांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी आपल्याला पाहताच का पळ काढला याचा विचार केला आणि त्यांचा पाठलाग करू लागले. त्यानंतर समोरून एक अ‍ॅम्ब्युलन्स सायरन वाजवत येत होती, त्यामुळे मोटारसायकलस्वारांना समजलं की आपल्याला दोन्हीकडून पोलिसांनी घेरले. अखेर पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी पोलिसांच्या वाहनाच्या दिशेने हवेत गोळीबार केला आणि मोटारसायकल जोरात पळवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR