21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रअकोल्यात महायुतीमध्ये वादाचे संकेत

अकोल्यात महायुतीमध्ये वादाचे संकेत

अकोला : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. अकोला जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा जिल्हा आहे. अकोला जिल्ह्यात जागा वाटपावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघांपैकी चार जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. तर बाळापूर विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचा आमदार आहे. भाजपने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाने बाळापूरसह अकोट विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याने दोन्ही पक्षांत जागा वाटप करून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी बाळापूर मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी पक्षाकडे बाळापुरातून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासोबतच पक्षाच्या काही प्रमुख पदाधिका-यांनी रामेश्वर पवळ यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे एक राज्य समन्वयक असलेले नरेश मस्के खासदार झालेले असताना दुस-या राज्य समन्वयकांना शिंदे विधानसभेची उमेदवारी देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

रामेश्वर पवळ यांनी सांगितले होते की, मतदारसंघावर दावा करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. मात्र महायुतीतील जागावाटप हे पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतूनच होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूर आणि रिसोड या तीन मतदारसंघांवर आमचा दावा, असेही त्यांनी सांगितले होते. बाळापूर हा आमचा नैसर्गिक दावा असलेला मतदारसंघ आहे. पक्षाने आपल्याला संधी दिली तर निश्चितच बाळापुरातून विजयश्री खेचून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी मतदारसंघात कोणताही विकास केला नाही. नितीन देशमुख यांचा राजकारण ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न असणार आहे. त्यांच्याकडे कोणत्या ऑडिओ आणि व्हीडीओ क्लिप असतील त्या त्यांनी खुशाल लोकांसमोर आणाव्यात, असेही रामेश्वर पवळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे रामेश्वर पवळ हे राज्य समन्वयक आहेत. रामेश्वर पवळ हे १९९० पासून राजकारणात आहेत. अकोला, वाशिम आणि बुलडाणा हे तिन्ही जिल्हे राजकीय कार्यक्षेत्र राहिले आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR