22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रअचानक ७६ लाख मतदान कसे वाढले?

अचानक ७६ लाख मतदान कसे वाढले?

  नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला विचारले मोठे सवाल

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल. सध्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, असे असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतमोजणीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच या निवडणुकीत मतदारांचा टक्का कसा वाढला? याबाबतही काही नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.

तसेच निवडणूक आयोगाला काही सवाल करत गंभीर आरोप देखील केले आहेत. ‘‘मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचे दिसत असून याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, तसेच रात्री उशिरापर्यंत कोणत्या मतदान केंद्रावर मतदान सुरू होते? हे निवडणूक आयोगाने सांगावे? राज्यात किती वाजेपर्यंत मतदान सुरू होते? याचे फुटेज आम्हाला मिळायला हवे. ७६ लाख मतदानाची वाढ कशी झाली?’’, असे अनेक सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत.
‘‘कोणतीही निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती देत असते. अशा प्रकारची परंपरा आतापर्यंत राहिली आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही. महाराष्ट्रात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत फरक जाणवतो आहे. जवळपास ७६ लाख मतदान वाढले आहे.

मग मतदानाची ही वाढ कशी झाली? आता आम्हाला जे सांगितले जाते की रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झाले. मग कमीत कमी दोन ते तीन किलोमीटरच्या मतदारांच्या रांगा असतील. मग निवडणुका पारदर्शक घेण्यासाठी निवडणूक आयोग फोटो, व्हीडीओ वगैरे काढत असते. मग निवडणूक आयोगाने आम्हाला रात्री मतदारांच्या रांगा लागल्या होत्या की नाही, म्हणजे संध्याकाळपर्यंत मतदानाची आकडेवारी ५८.२२ टक्के होत असेल तर मग असे काय झाले की रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झाले?’’, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

‘‘मतदानाचे प्रमाण कसे वाढले? मतदान जवळपास ७.५ टक्क्यांनी वाढले. मग याचे उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावे. राज्यात मतदानाचा टक्का जो वाढला आहे त्याबाबत गंभीर प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहेत. स्वत: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचे पती त्यांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मी जे प्रश्न उपस्थित केले ते त्यांनी देखील उपस्थित केले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणूक आयोगाने याचे उत्तर दिले पाहिजे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता मतदान झालेले आहे. त्याचे फोटो आणि
व्हीडीओ आम्हाला निवडणूक आयोगाने दिले पाहिजेत. हे मतदान कोणत्या केंद्रावर झाले? साडेसात टक्क्यांनी मतदान कसे वाढले?’’, असे प्रश्न नाना पटोले यांनी आयोगाला विचारले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR