मुंबई : मनोज जरांगे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर अजय महाराज बारस्कर यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान ‘सागर’ बंगला गाठला.
सागर बंगल्याच्या बाहेर बसत अजय महाराज बारस्कर यांनी आंदोलन केले. समाजासाठी आपण येथे बसलो असल्याचे बारस्कर म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांचे नाव न घेता ते येथे येणार होते पण अर्ध्यातून परत गेले पण मी येथे आलो, असे म्हणत डिवचले.
पंढरपूरला वारीसाठी जाणा-या अजय बारस्कर यांना धमक्या येत होत्या. त्यासंदर्भातील व्हीडीओ त्यांनी सोशल मीडियावर टाकले होते. आषाढी एकादशी दिवशी दर्शनासाठी गेलेल्या बारस्कर यांची महागडी गाडी जाळून टाकण्यात आली. याविषयी बारस्कर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
बारस्कर हे गाडी जाळल्यानंतर आक्रमक झाले. त्यांनी आज (शनिवारी) सागर बंगल्यावर धाव घेत फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तसेच बंगल्याबाहेरच आपले ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, थोड्याच वेळात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.