28.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात

अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात

पुणे : अठराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीने ३० तर महायुतीने केवळ १७ जागा जिंकल्या आहेत. या अपयशामुळे महायुतीतील सर्वच पक्ष बॅकफूटवर ढकलले गेले आहेत. अशातच आता शिवसेनेच्या शिंदे गटातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीतील भवितव्याबाबत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, अजित पवार गटातील आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जात आहेत. शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे की, अजित पवारांच्या गटातील १८ ते १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत.

रोहित पवार म्हणाले, अजित पवारांचे १९ आमदार शरद पवाराच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गटातील इतर १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. परंतु, या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. आमचे त्यांना (शरद पवार) एकच सांगणे आहे की, पक्षाच्या अडचणीच्या काळात जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिले त्यांनाच पहिले प्राधान्य द्यायला हवे. जे लोक स्वत:च्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेले असेल त्यांना दुसरे प्राधान्य द्यावे, असे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटते.

यावेळी रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, युगेंद्र पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकिट दिले जाणार का? यावर रोहित पवार म्हणाले, ‘‘कोणाला तिकिट द्यायचं आणि कोणाचं तिकिट नाकारायचं याचा निर्णय केवळ शरद पवार घेतात. त्यामुळे हा प्रश्न शरद पवारांना विचारावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते बाळासाहेब, जयंत पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आमचे शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील.’’

रोहित पवार म्हणाले, ‘‘येत्या काळात विधानसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशची जबाबदारी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावर टाकली तर तिथले कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संगनमत ठेवून त्या भागात आमचे जास्त आमदार कसे निवडून आणता येतील यावर काम करेन.’’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR