27.1 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या अडचणीत वाढ

अजित पवारांच्या अडचणीत वाढ

शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी क्लिन चीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप

पुणे : प्रतिनिधी
कोट्यवधींच्या शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला असून याविरोधात सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी विशेष सत्र न्या. राहुल रोकडे यांनी अर्जदारांना निषेध याचिका दाखल करण्यास वेळ दिला असून २९ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

शिखर बँकेने २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप केले होते. राज्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते. मात्र, ही सर्व कर्जे बुडीत निघाली. याप्रकरणी शिखर बँक संचालकपदी असलेल्या अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २५ हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यामध्ये कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीसंबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली. मात्र, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी (ता. १३) विशेष सत्र न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अण्णा हजारे आणि जाधव यांच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे.

त्यानुसार न्यायालयाने अर्जदारांना वेळ देत २९ जूनला पुढील सुनावणी ठेवली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. २९ जूनला कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR