नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी आता दिल्लीत पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव आणि राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी शनिवारी ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आम आदमी पक्षाने सर्व ७० तर काँग्रेसने ४७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपची मात्र अद्याप एकही यादी आलेली नाही.
राकाँने मुलायम सिंह (बदली), रतन त्यागी (बुरारी), खालिद उर रहमान (चांदणी चौक), मोहम्मद हारुण (बल्लीमारन), इम्रान सैफी (ओखला), नरेंद्र तन्वर (छतरपूर), नमाहा (लक्ष्मी नगरमधून), जगदीश भगत (गोकुळपुरी), खेम चंद (मंगोलपुरी), राजेश लोहिया (सीमापुरी) आणि कमर अहमद (संगम विहार) यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा मिळविण्याचे लक्ष्य अजित पवार यांनी निर्धारित केले आहे. राकाँ रालोआचा घटक पक्ष असला तरी दिल्लीत आघाडी न झाल्यामुळे पक्षाने पहिली यादी जाहीर केली. दिल्लीत जवळपास २५ उमेदवार उतरविण्याची तयारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राकाँने केली आहे.