वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, राष्ट्रवादीत दिलजमाईची चर्चा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. आज शरद पवार यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
आज शरद पवार यांचा वाढदिवस होता. शरद पवार यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणात वैचारिक विरोधाला कधी व्यक्तिगत विरोधामध्ये बदलू दिले नाही. त्यामुळे शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. सर्वच पक्षात त्यांचे मित्र आहेत. त्यामुळे विविध पक्षांतील नेत्यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु अजित पवारांनी शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांचे निवासस्थान गाठणे ही खास बाब आहे. कारण शरद पवारांच्या उतारवयात अजित पवारांनी त्यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. शरद पवारांनी स्वबळावर उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अजित पवारांकडे आहे. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी ४१ जागांवर विजय मिळविला आहे. दरम्यान, अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पसरली असून, खा. संजय राऊत यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला. दुसरीकडे शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत, त्यामुळे त्यांना सर्वच पक्षातील राजकीय नेते भेटत असतात,असे सांगत त्यांनी सारवासारव केली.
अमित शाहही पवारांच्या भेटीला
एकीकडे अजित पवार यांनी आपल्या नेत्यांसह शरद पवार यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी ५ च्या दरम्यान अमित शाह ६ जनपथ या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि पवारांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. या भेटीवरून यामागे काही वेगळे राजकारण आहे का, याबाबतही चर्चा रंगली आहे.