नवी दिल्ली : अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाच्या दोनपैकी एकाही खासदाराला मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलेला नाही, यामुळे अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार का नाही, असा प्रश्न पडला आहे. लोकसभेच्या एकूण चार जागा लढवल्या होत्या. मात्र त्यापैकी केवळ रायगड मतदारसंघात त्यांना यश आले. येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी विजय मिळवला होता. एका जागी त्यांना यश मिळालं आहे. अजित पवार गटाचे केवळ सुनील तटकरे निवडून आले आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारचे नेते म्हणून नरेंद्र मोदी आज तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांना स्थान देण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात मागील वर्षी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला एकही मंत्रिपद आजच्या शपथविधीमध्ये दिले जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा गटाची समजूत काढण्यासाठी सुनील तटकरेंच्या घरी बैठकीसाठी गेले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्रीही उपस्थित आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नारायण राणे आणि भागवत कराड या माजी मंत्र्यांनाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.