25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवार धर्मसंकटात!

अजित पवार धर्मसंकटात!

दिल्लीचे तिकीट पत्नी, मुलगा की भुजबळांना?

पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी २५ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाही अद्याप अजित पवार यांच्याकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच पक्षातील इतरही काही नेते इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत राष्ट्रवादीत संभ्रम असल्याचे दिसत आहे.
पार्थ पवार यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पराभव झाला होता. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना बारामतीतून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबातील एका सदस्याचे राज्यसभेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते नक्की पार्थ पवार यांना संधी देतात की सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, की ओबीसी नेते छगन भुजबळ यांना दिल्लीचे तिकीट देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासाठी ठराव
पुण्यातील नारायण पेठ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात नुकताच पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्वानुमते एक ठराव मांडण्यात आला. या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल, अशी भूमिका मांडण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR