बारामती : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील पवार कुटुंबामधील लढतीची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. या लढतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधील पूर्ण पवार कुटुंब उतरले आहे. आता अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर तुफान हल्ला केला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याबद्दल शाब्दीक फटकारे लगावले आहे. अजित पवार यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी आहे, असा घणाघाती हल्ला श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना काटेवाडीत बोलताना लगावला आहे.
आमची जेव्हा चर्चा झाली, तेव्हा आमदारकीला तू आहे. खासदारकीला साहेबांना राहू दे, असे स्पष्ट आपण अजित पवार यांना सांगितले होते, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले. ते म्हणाले, साहेबांचे (शरद पवार) आपल्यावर खूप उपकार आहेत. काटेवाडीतील गावकरी म्हणून तुम्हाला हे सर्व माहीत आहे. त्यांचे ८३ वय झाले म्हणून त्यांची साथ सोडणे मला पटले नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही. आपणास दुस-या माणसांकडून लाभ मिळणार आहे, यामुळे सोडणे चुकीचे आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नसते, असे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना सुनावले.
पदे फक्त साहेबांमुळेच मिळाली
ज्यांना पदे मिळाली ती फक्त साहेबांमुळे मिळाली. त्याच साहेबांना आपण म्हणतो, आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा. हे माझ्या मनाला पटत नाही. औषधांची एक्सप्रायरी डेट असते. काही नात्यांची एक्सप्रायरी डेट असते. कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जावे मला पटत नाही, असे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी म्हटले.
ही संघाची अन् भाजपची चाल
पवार नाव संपवायचे, ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चाल आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केला. आता त्यांनी घरच फोडले. साहेबांना एकुलती एक एक मुलगी आहे. या वयात त्यांना काय वाटत असणार? लक्षात ठेवा वय वाढले म्हणून वयस्कर माणसांना तुम्ही कमजोर समजू नको. त्यांनी तुमच्यावर राज्य सोपवले होते. ते दिल्ली पाहत होते. परंतु तुम्ही वेगळेच काही केले, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले.