मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते मंडळंनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीवर जी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून अजित पवार आणि शरद पवारांची भेट उद्धव ठाकरे गटाला खटकली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवारांनी आज दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार उपस्थित होते. या भेटीवर संजय राऊत म्हणाले की, आम्ही आमच्या स्वार्थासाठी चूक केली असती तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत झाली नसती. मला लाजही वाटली असती. परंतु हे माझे वैयक्तिक मत आहे.
दरम्यान, आम्ही जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा साधे घर दिले होते. सुनेत्रा पवारांना ११ जनपथवर टाईप सेवनचं घर देऊन अजित पवारांची दिल्लीत येण्या-जाण्याची सोय केली आहे. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते. नेत्यांना कमी लेखण्यासाठी हे करते. दिल्ली ही कारस्थानाची राजधानी आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे माहिती आहे का, राज्यात रोज खून होतायेत, दंगली होतायेत आणि ते आम्हाला अक्कल शिकवतायेत असा टोला संजय राऊतांनी महायुतीला लगावला.