जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात सोयाबीन पिकाचे तेरा हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेले आहे तर कापसाचे तीन हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. सध्या जळकोट तालुक्यामध्ये पंचनामे करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे .
जळकोट तालुक्यामध्ये जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला यामुळे शेतक-यांंनी मूठ झाडावर धरली आणि पेरणी उरकली . यानंतर दहा ते बारा दिवस पावसाने उघडीप दिली मात्र जुलै महिन्यापासून जळकोट तालुक्यात सतत पाऊस पडत आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये जळकोट तालुक्यात पावसाची संततधार होती . ऑगस्ट महिन्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये तीन ते चार वेळेस अतिवृष्टी झाली . तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस झाला. तसेच जळकोट तालुक्यातील जळकोट शहर तसेच परिसर व वांजरवाडा परिसर या ठिकाणीही १६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली यासोबतच घोणशी मंडळामध्येदेखील अतिवृष्टी झाली . यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले .
अतिवृष्टीमुळे अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी पिकासह खरडून गेल्या तर शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे अती पावसाने पिके वाळून गेली तसेच अधिक पावसामुळे पिकांच्या मुळ्या कुजून गेल्या यामुळे मर रोगाची लागण झाली यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता पाऊस उघडला तरीही पिके उत्पन्न देतील याची शाश्वती नाही .
तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी , तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांच्यासह लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस उषाताई कांबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे , यांच्यासह अनेक नेते मंडळींनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-याच्या शेतीला भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी केली होती तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतक-याच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांनी केली होती .
जळकोट तालुक्यामध्ये ऑगस्ट तसेच सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले होते. यापूर्वी वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहणीही करण्यात आली होती यामध्ये सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे झाले असून या खालोखाल कापसाचे नुकसान झालेले आहे. तसेच इतर पिकांचेही नुकसान झाले आहे . वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेनुसार या सर्व पिकांचे पंचनामे करणे सुरू असून हे पंचनामे अंतिम टप्प्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी दिली .