30.6 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeलातूरअनाथ लेकरांसोबत साजरा केला जातो गुढीपाडवा

अनाथ लेकरांसोबत साजरा केला जातो गुढीपाडवा

लातूर : प्रतिनिधी
शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात रविवारी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घराघरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने अनाथ लेकरांसोबत गुढीपाडवा साजरा केला जातो. या गुढीपाडवा उत्सवाला माणुसकीची गुढी, असे नाव देण्यात आले असून, अनाथांनाही सण साजरे करता यावेत यासाठी हा उपक्रम गत आठ वर्षांपासून राबविला जात असल्याची माहिती प्रतिष्ठानने दिली आहे.
लातूर शहरातील एमआयडीसी भागातील मुलींचे निरीक्षण गृह (अनाथाश्रम) येथे वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी विधिवत पूजा करुन तेथील अनाथ मुलींना मिठाई आणि बताशाचे हार देण्यात आले. अनाथांच्या चेह-यावर हास्य फुलावे आणि समाज आपल्यासोबत आहे हा संदेश देण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान गेल्या ९ वर्षांपासून इथे दिवाळी आणि पाडवा हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरा करते. यावेळी येथील मुलींनी रांगोळी काढून त्यावर माणुसकीची गुढी असे लिहण्यात आले.
दिवसेंदिवस माणुसकी हरवत चालली आहे. माणुसकी कायम जिवंत राहावी यासाठी ही माणुसकीची गुढी उभारली जाते असे यावेळी सांगण्यात आले. अनाथ मुलांसोबत वाढदिवस, सण आणि उत्सव प्रतिष्ठानच्या वतीने साजरे केले जातात. शिवाय, त्यांना शैक्षणिक साहित्याचीही मदत करण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी नेहमीच पुढाकार घेतात. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी या अनाथाश्रमात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला. या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, सचिव रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल आप्पा स्वामी, वृक्ष लागवड अभियान प्रमुख राहुल माशाळकर व कर्मचारी जाधव सर आदींनी सहभाग नोंदवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR