अहिल्यानगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पक्षाच्या सर्व पदे व सदस्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनीही आपले राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना हा मोठा धक्का समजला जात आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे.
मागील आठवड्यातच शरद पवार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्या भेटी घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी नागवडे केली होती. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.’
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल या चिन्हावर लढण्यासाठी अनुराधा नागवडे यांनी पूर्ण तयारी केली आहे . तर शरद पवार यांच्या पक्षाकडून माजी आमदार राहुल जगताप हे देखील प्रबळ दावेदार आहेत.