29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रअपघात वार, १२ ठार

अपघात वार, १२ ठार

सोलापूर जिल्ह्यात ४, जालन्यात ४, अहिल्यानगरमध्ये तिघे ठार
गाणगापूर रस्त्यावर नांदेड जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला, ४ ठार, ८ गंभीर
अक्कलकोट/जालना/अहिल्यानगर
अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर मैंदर्गीनजीक शाब्दी फॉर्म हाऊससमोर गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जाणा-या भाविकांच्या स्कार्पिओ जीप व आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात स्कार्पिओ जीपमधील ४ भाविक जागीच ठार झाले तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात स्कार्पिओ जीपचा चेंदामेंदा झाला तर आयशर ट्रक उलटला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. दरम्यान, जालना जिल्ह्यात ४, अहिल्यानगर जिल्ह्यात ३ आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस उपनिरीक्षक अशा एकूण १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला.

या अपघातात हनमळू गंगाराम पाशावार (३५,रा. कुंडलवाडी, नांदेड), गंगाधर राजण्णा कुर्णापल्ले (४५, रा. केरुळ, ता. बिलोली, जि. नांदेड), सागराबाई गंगाराम कुर्णापल्ले (रा. केरुळ, ता. बिलोली), वैष्णवी उर्फ ऐश्वर्या हनमळू पाशावार (१४, रा. कुंडलवाडी) हे मयत झाले असून फिर्यादी योगेश्वर गंगाधर कुर्णापल्ले (२०), तेजेस गंगाधर मानोरे (३०, रा. चिंबळी, ता. खेड), पिंटू बाबूलाल गुप्ता (२८, रा. पुणे), नामदेव बालाजी वाडेकर (२९, रा. चिंबळी, ता. खेड), छाया मोहन शिरलेवाड (३५, रा. चिंबळी, ता. खेड) जखमी झाले असून त्यांच्यावर अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच जयश्री पिंटूगुप्ता (२५, रा. चिंबळी, ता. खेड), सावित्रा हनुमंत पायवल (४०, रा. कुंडलवाडी), आकाश हनुमंत पायावल (१०, रा.कुंडलवाडी), ऋतुजा मोहन शिरलेवाड (३, रा. चिंबळी, ता. खेड), कातिर्की श्रेयस गुप्ता (२, रा. चिंबळी, ता. खेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अक्कलकोट येथून देवदर्शन झाल्यानंतर नांदेड व पुणे येथील भाविक स्कॉर्पिओतून मैंदर्गी मार्गे गाणगापूरला देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी मैंदर्गीहून अक्कलकोटकडे येणा-या आयशर ट्रकने (क्र.जीजे १५ एव्ही १४६६) स्कॉर्पिओला (क्र. एमएच १४ डीए १००१) जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळतात दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश स्वामी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरवसे, सुभाष दासरे व व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर झालेल्या अपघाताची अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली. अपघाताची फिर्याद योगेश्वर गंगाधर कुर्णापल्ले (२०, रा. चिंबळी, फाटा डोंगरे वस्ती, कुरोळी) सध्या ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट यांनी दिली.

जालना जिल्ह्यात एकाच
कुटुंबातील चौघे ठार
जालना जिल्ह्यात सोलापूर-धुळे महामार्गावर महाकाळामध्ये उभ्या असलेल्या आयशर ट्रकला मागून स्कॉर्पिओ कार धडकली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघेजण जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. सोलापूर-धुळे महामार्गावर आयशर ट्रकला बीडकडून संभाजीनगरकडे जाणा-या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.

नगर जिल्ह्यात एकाच
कुटुंबातील तिघे ठार
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर जुन्नरनजीक सीतेवाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झाले. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास हा अपघात झाला. हे तिघेही पिंपरीपेंढार (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये
पोलिस उपनिरीक्षक ठार
पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये कर्तव्यावर असताना पोलिस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. जितेंद्र गिरनार असे त्यांचे नाव आहे. नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून पीएसआय गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. ते कारमधून जात असताना कंटेनरने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR